राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या आणि तिकीट दरांत ५० टक्के सूट अपेक्षित असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड अनिवार्य केल्यानंतर राज्यभरात ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नुकतेच आधार कार्ड नसल्याने आणि पूर्ण शुल्क भरून तिकीट काढण्यास पैसे नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून उतरवण्यात आल्याची घटना शिर्डी येथे घडली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आधार कार्डाबरोबरच पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि राज्य सरकारने दिलेले ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र आदी गोष्टीही ग्राह्य़ धरण्यात याव्यात, असे आवाहन केले आहे. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते आपल्या आदेशांबाबत ठाम आहेत.
एसटी महामंडळाच्या गाडय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी याआधी तहसीलदाराने दिलेला वयाचा दाखलाही ग्राह्य़ मानला जात होता. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आणि तब्बल ५००हून अधिक बनावट दाखले पकडले. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासादरम्यान सवलतीसाठी आधार कार्ड दाखवणे अनिवार्य केले. या आदेशाची अमलबजावणी करण्यात आली असली, तरी अद्याप प्रवाशांना त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. एसटीच्या संकेतस्थळावरही त्याची माहिती नसून तिकीट आरक्षण खिडकीवरही एकही फलक लिहिलेला नाही.
या आदेशाचा फटका १४ फेब्रुवारी रोजी शिर्डीहून मुंबईला येणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांना बसला. मुंबईत डॉक्टरी पेशा करणारे डॉ. राजकुमार फडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मुंबईला येण्यासाठी शिर्डीहून गाडी पकडली. मात्र वाहकाने गाडी सुटण्याआधीच या आदेशाची माहिती देत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. मात्र काही जणांकडे आधार कार्डऐवजी इतर ओळखपत्रे होती. पण वाहकाने अत्यंत उद्धटपणे या सर्वाना ‘आधार कार्ड दाखवा किंवा पूर्ण तिकीट काढा. नाहीतर गाडीतून खाली उतरा’ असे सांगितले. डॉ. फडणीस यांच्याकडे आधार कार्ड होते. मात्र गाडीतील सात ते आठ प्रवाशांना खाली उतरावे लागले. या प्रकाराने व्यथित होत फडणीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आदी दाखले सरकारीच आहेत. मात्र केवळ आधार कार्ड दाखवण्याचा हट्ट सरकार का करत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अशा प्रकारे छळ करणारे ‘अच्छे दिन’ फडणवीस सरकारला अपेक्षित आहेत का?
 –  राजकुमार फडणीस, तक्रारदार

गैरसोय होते हे मान्य, पण..
आधार कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेकांची गैरसोय होते हे मान्य आहे. पण एसटीचे नुकसान टाळण्यासाठी ते आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच लागू आहे. पण पॅन कार्डवर प्रवाशांचा पत्ता नसतो. आजकाल बँकेतही आधार कार्ड आवश्यक बाब झाली आहे. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड बनवून घ्यायला हवे. तोपर्यंत पूर्ण रक्कम भरून तिकीट काढायला हवे. – दिवाकर रावते -परिवहनमंत्री