विभागप्रमुख नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर
नीलेश अडसूळ, लोकसत्ता
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील तिन्ही अध्यापकांना परस्परांवरील आरोपांमुळे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने या विभागाची अवस्था नेतृत्वहीन झाली असून विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
माजी विभागप्रमुख डॉ. संजय रानडे यांच्या विभागप्रमुखपदाची मुदत संपून महिना उलटला तरी नव्या विभागप्रमुखांनी पदभार स्वीकारलेला नाही. विशेष म्हणजे विभागात शिकवणाऱ्या तिन्ही प्राध्यापकांवर एकमेकांवरील तक्रारींमुळे न्यायालयीन खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही पदभार स्वीकारू शकत नाही. त्यामुळे आता विभागाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न आहे.
गेली वर्षभर विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग चांगलाच चर्चेत राहिला आहे. विभागातील तीन प्राध्यापकांपैकी प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा तर प्रा. डॉ. संजय रानडे आणि एका महिला प्राध्यापिकेवर अॅट्रॉसिटीचा खटला सुरू आहे. शिवाय प्राध्यापकांमधील अंतर्गत वादामुळे विभागातील सामंजस्याचे वातावरणही गढूळ झाले आहे. या घटनांचा एकं दर फटका प्रशासकीय कामकाजावर आणि विद्यार्थ्यांवर होत आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दस्तावेजांवर विभागप्रमुखांची स्वाक्षरी लागते. मात्र ती घ्यायची कुणाकडून, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. तर विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीविना प्रशासनाचे अंतर्गत व्यवहारही अडून आहेत. विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीविना शिक्षकांचे मासिक वेतन आणि बाहेरून येणाऱ्या व्याख्यात्यांचे मानधन विद्यापीठ कसे देणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.
नेतृत्वविना फार काळ विभाग चालवणे कठीण असल्याने विद्यापीठाला प्रभारी विभागप्रमुख नेमण्याखेरीज पर्याय नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. विभागाची अशी नेतृत्वहीन अवस्था असताना विद्यापीठ प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून तोडगा काढावा. अन्यथा आम्ही आंदोलन करू,’ असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेने दिला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
चर्चेतला विभाग
पूर्वी या विभागात मास्टर ऑफ आर्ट्स (कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम), मास्टर ऑफ आर्ट्स (पब्लिक रिलेशन), मास्टर ऑफ आर्ट्स (इलेक्ट्रॉनिक मीडिया), मास्टर ऑफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडीज) आणि मास्टर ऑफ आर्ट्स (फ्लिम स्टडीज) हे अभ्यासक्रम चालविले जात होते. दरवर्षी देशभरातून विद्यार्थी विभागात प्रवेशासाठी येत. परंतु गेल्या वर्षी यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिव्हिजन स्टडीज आणि फ्लिम स्टडीज हे अभ्यासक्रम बंद करण्यात आले. आता केवळ मास्टर ऑफ आर्ट्स (कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम), मास्टर ऑफ आर्ट्स (पब्लिक रिलेशन) हे दोन अभ्यासक्रम सुरू असून साधारण १६० इतकी विद्यार्थी संख्या आहे. अभ्यासक्रमांचे कालबाह्य़ स्वरूप, अपुरे मनुष्यबळ, जागेचा अभाव यांमुळे हे अभ्यासक्रम बंद करण्यात आले होते.