चार राज्यांच्या निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय परिणाम होईल का, याबाबत विविध मतामतांतरे असली तरी हा निकाल सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी निश्चितच धोक्याचा इशारा आहे. काँग्रेसला या निकालांचा नक्कीच बोध घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.
चार राज्यांच्या निकालांमुळे शिवसेना-भाजप-रिपब्लिकन आठवले युतीचा विश्वास अधिक बळावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा युतीचा प्रयत्न आहे. राज्यातील ४८ जागांपैकी आघाडी किंवा युतीमध्ये दोन-तीन जागांचा फरक पडतो. गेल्या वेळी आघाडीचे २५ तर युतीचे २० खासदार निवडून आले होते. यंदा राज्यातून ३० खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातूनच नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी अहमदाबादमध्ये वेळ दिला. मोदी यांचे राज ठाकरे प्रेम लक्षात घेता शिवसेनेने आधी मोदी यांच्यापासून चार हात दूर राहण्यावर भर दिला होता. मात्र शिवसेनेला दुखवून चालणार नाही याचा अंदाज भाजपच्या नेत्यांना आल्यावरच शिवसेनेने मोदी यांचे नेतृत्व मान्य केले. राज्यातून चांगले यश मिळविण्यासाठी मनसेची मदत घ्यावी, असा भाजप नेत्यांचा अजूनही प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसच्या विरोधात सध्या वातावरण असले तरी हाच कल पुढील चार महिने कायम ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे परिणाम पुढील ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पडतील. भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास राज्याची सत्ता कायम राखणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी निश्चितच कठीण जाण्याची शक्यता आहे.
चार राज्यांच्या निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. कारण राज्यातील जनता नेहमीच निधर्मवादी आघाडीच्या मागे ठामपणे उभी राहते, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. राज्यात आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पार सफाया होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकारवर प्रचंड नाराज असून, जनता त्यांना असा काही धडा शिकवील की आघाडी औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.
चार राज्यांच्या निकालांचा राज्यातील राजकीय परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नाही, पण काँग्रेसला या निकालांचा बोध घेऊन सुधारणा करावी लागेल, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने निकाल गांभीर्याने घेतले
चार राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसच्या गोटात साहजिकच अस्वस्थता पसरली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून खासदारांचे संख्याबळ चांगले असावे, अशी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाची अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर चार राज्यांच्या निकालांचा कितपत फरक पडू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी खलबते केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह काही निवडक मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणती व्यूहरचना आखावी लागेल यावर खल करण्यात आला.

Story img Loader