उन्हाळ्याचे तडाखे बसण्यास सुरुवात झाल्याने आता वीजमागणी वाढणार असली तरी त्यामुळे विजेची टंचाई भासणार नाही आणि भारनियमन करावे लागणार नाही, अशी व्यवस्था ‘महावितरण’ने केली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या तरी भारनियमनाचे चटके बसणार नाहीत. इतकेच नव्हे तर भारनियमन नियंत्रणात ठेवण्यासाठी मिळेल तेथून वीज विकत घेणारा महाराष्ट्र आता रोज रात्रीच्या वेळी इतरांना विजेची विक्री करत आहे.
मागील काही महिन्यांत राज्यातील विजेची मागणी साडेसोळा हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. नंतर ती साडेतेरा हजार मेगावॉटपर्यंतखाली आली होती. आता एप्रिल आणि मे या कडक उन्हाच्या महिन्यांत राज्यातील विजेची मागणी सरासरी १६ हजार मेगावॉट असेल असा अंदाज आहे. ही मागणी भागवण्यासाठी ‘महानिर्मिती’च्या औष्णिक प्रकल्पांमधून सुमारे साडेपाच हजार मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पांतून दीड हजार मेगावॉट, वायूवर आधारित प्रकल्पातून ३५० मेगावॉट, केंद्र सरकारकडून साडेपाच हजार मेगावॉट, तर अदानी पॉवर, जिंदाल, मुंद्रा आदी खासगी प्रकल्पांतून २५०० मेगावॉट अशा रीतीने १५ हजार ३५० मेगावॉटच्या आसपास विजेची उपलब्धता असेल, असे नियोजन करण्यात
आले आहे. त्यामुळे राज्यात विजेच्या
टंचाईमुळे भारनियमन करावे लागणार नाही. नेहमीप्रमाणे वीजचोरी आणि विजेचे पैसे न भरणाऱ्या भागांत केवळ धोरण म्हणून भारनियमन करण्यात येईल, असे ‘महावितरण’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
तसेच ‘अदानी पॉवर’चा आणखी एक ६६० मेगावॉटचा वीजसंच आता सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता भरपूर असणार आहे. त्यामुळेच आता भारनियमन नियंत्रणासाठी बाजारपेठेतून सतत वीज घेण्याची वेळ येणार नाही. आताच महाराष्ट्र रोज रात्रीच्या वेळी २०० ते ५०० मेगावॉट वीज इतरांना विकत आहे. ते प्रमाण हळूहळू वाढेल, असे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा