डबेवाल्यांसह व्यापारी, विक्रेते नाराज; मालवाहतुकीसाठीच्या डब्याची चाचपणीच नाही
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर भविष्यात येणाऱ्या सर्व लोकल गाडय़ा वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजांच्या असतील, असा निर्णय झाल्यानंतर आता मुंबईतील फळे, फुले, भाजी, दूध, मासळी विक्रेते, डबेवाले आणि लहान व्यापारी यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या नव्या गाडय़ा मेट्रोच्या गाडय़ांच्या धर्तीवर तयार होणार असून त्यात मालवाहतुकीसाठी वेगळा डबा नसल्याने आपला माल कसा न्यायचा, हा प्रश्न भविष्यात या विक्रेत्यांसमोर आ वासून उभा आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये दाखल झालेल्या आणि सध्या चाचणी प्रक्रियेत असलेल्या मुंबईच्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलमध्येही मालवाहतुकीसाठी विशेष डबा नाही.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान एमयूटीपी-३ या योजनेंतर्गत मुंबईत येणाऱ्या ४७ नव्या लोकल आणि विरार-वसई-पनवेल या नव्या मार्गासाठी दाखल होणाऱ्या १९ लोकल पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या गाडय़ांमध्ये एकमेकांशी आतूनच जोडलेले डबे, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे आदी वैशिष्टय़े असतील. असे असले तरी या गाडय़ांमध्ये मालवाहतुकीचा विशेष डबा कसा पुरवणार, या प्रश्नाची उकल अद्यापही झालेली नाही.
मुंबईत मालवाहतुकीच्या डब्यातून प्रामुख्याने मासळी विक्रेते, दूधवाले, डबेवाले, फळ-भाजी विक्रेते आणि छोटे व्यापारी आदी दरदिवशी वाहतूक करतात. परदेशातील अनेक विद्यापीठांनी ज्यांची दखल घेतली आहे, असे मुंबईचे डबेवाले दरदिवशी तब्बल एक ते सव्वा लाख डब्यांची ने-आण रेल्वेतून करत असतात. या सर्वाना नव्या वातानुकूलित गाडय़ांमध्ये नेमके कोणते स्थान मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे.
मुंबईतील नव्या वातानुकूलित गाडय़ा सध्या आलेल्या वातानुकूलित गाडीपेक्षा वेगळ्या असतील. या गाडय़ांची रचना मेट्रोच्या गाडय़ांच्या धर्तीवर करण्यात येणार असली, तरी आसनव्यवस्था सध्याच्या गाडय़ांप्रमाणेच असेल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही बाब लक्षात घेतल्यास मेट्रोमधून मासळी वा अवजड सामान नेण्यास परवानगी नसते. त्यामुळे या नव्या गाडय़ांमध्ये मालवाहतुकीला जागा कशी मिळणार, याबाबत अधिकारी चर्चा करत आहेत. मालवाहतुकीसाठी या गाडय़ांच्या रचनेत काय बदल करावे लागतील, ते बदल व्यवहार्य आहेत का, आदी गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. या गाडय़ांचे डबे एकमेकांना जोडलेले असल्याने व गाडय़ा वातानुकूलित ‘घमघमाट’ सुटणाऱ्या मासळीची वाहतूक होणार का, याबाबतही विचार होत असल्याचे अधिकारी म्हणाला.
मालवाहतुकीचा डबा अत्यंत महत्त्वाचा आहे. डबेवाल्यांसाठीच नाही, तर अनेक महत्त्वाच्या पदार्थाच्या विक्रेत्यांसाठी आणि छोटय़ा व्यापाऱ्यांसाठी हा डबा अत्यावश्यक आहे. वातानुकूलित नसला तरी या नव्या गाडय़ांना माल डबा पुरवण्यात यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
– रघुनाथ मेटगे, कार्याध्यक्ष, मुंबई डबे वाहतूक मंडळ