पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पवई तलावाच्या सभोवती सायकल ट्रँक उभारण्यात आला आहे. या सायकल ट्रँकला नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचं एक ट्विट चर्चेत आहे. ऋता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये त्या म्हणतात ” चुकीची गोष्ट कोणीही केली तरी ती चुकीचीच असते. सगळ्या पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन” महाविकास आघाडीतील एका महत्वाच्या मंत्र्याच्या पत्नीने थेट आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारणारं ट्विट केल्यामुळे ऋता आव्हाड यांचं हे ट्विट राजकीय चर्चेचा विषय झालं आहे. “मी पवईची मुलगी आहे” म्हणून मला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालमुळे आनंद झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘पवई लेक’ परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणत गर्दी करत असतात. पवई तलावाच्या भोवती सायकल ट्रॅक बांधण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून ठेवण्यात आला. प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पवई लेक परिसरात हा सायकल ट्रॅक बांधण्यात आला. या सायकल ट्रॅकच्या विरोधात स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने या सायकल ट्रॅकला स्थगिती दिली. हा प्रकल्प म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात होतं. पण हा प्रकल्प खरोखरंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ऋता आव्हाड ह्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंड आव्हाड यांच्या पत्नी आहेत. नुकताच ऋता आव्हाड यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला विभागाच्या ठाणे विभागीय अध्यक्षपदी ऋता आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऋता आव्हाड यांना माहेरकडूनदेखील राजकीय वारसा मिळालेला आहे. माजी आमदार आणि जेष्ठ कामगार नेते दिवंगत दादा सामंत हे ऋता आव्हाड यांचे वडील असून दिवंगत जेष्ठ कामगार नेते दत्ता सामंत हे त्यांचे काका आहेत. ऋता आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातुन थेट शिवसेनेच्या युवराजांनाच प्रश्न विचारल्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आहेत का या चर्चेला पुन्हा वाट मिळाली आहे.