मुंबई : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येत्या रविवारी (२८ ऑगस्ट) भाविक मोठय़ा संख्येने बाजारपेठांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्व  मुख्य मार्गावर या दिवशी मेगा ब्लॉक घेणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस   – चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मात्र मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

ठाणे- वाशी, नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे येथून  सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी आणि वाशी, नेरुळ, पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

सीएसएमटी येथून चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे -सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या आणि सीएसएमटीतून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या कालावधीत वांद्रे, गोरेगाव येथे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.

पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

अंधेरी स्थानकातील उद्वाहकात अडकलेल्या प्रवाशांची २० मिनिटांनंतर सुटका

मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकातील उद्वाहकामध्ये (लिफ्ट) १५ प्रवासी अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. रेल्वचा विद्युत विभाग आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे या प्रवाशांची २० मिनिटांनी सुटका केली. अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि तीनवरील उद्वाहकांमध्ये शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला. त्यावेळी सुमारे १५ प्रवासी त्यामध्ये होते. रेल्वेच्या विद्युत विभागातील कर्मचारीआणि अग्निशमन दलाने या प्रवाशांच्या सुटकेसाठी तात्काळ प्रयत्न केले. उद्वाहकांच्या दुरुस्तीनंतर हे प्रवासी बाहेर आले, अशी माहिती, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

Story img Loader