लाखो मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेच्या सुरक्षेशी रेल्वेच्या यंत्रणा कशा  बेपर्वा वागत असतात,आणि एवढे होऊनही झालेल्या चुकीचे खापर दुसऱ्याकडेच कसे फोडतात, याचे प्रत्यंत्तर बुधवारी दुपारी बोरिवली स्थानकात आले. लोकलला हिरवा सिग्नल नसतानाही मोटरमनने गाडी तशीच पुढे  नेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विरारहून चर्चगेटकडे जाणारी उपनगरी गाडी सिग्नल तोडून काही अंतर पुढे गेल्याने बोरिवली रेल्वे स्थानकात गोंधळ झाला.  त्याचवेळी गाडीतील स्वयंचलित ब्रेक यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र बोरिवली रेल्वे स्थानकातील ‘पॉइंट फेल’ झाल्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.
बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर विरारकडून चर्चगेटकडे येत असलेल्या जलद उपनगरी गाडीच्या मोटरमनने सिग्नल नसतानाही गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सिग्नल नसताना गाडी पुढे गेल्यास तात्काळ कार्यान्वित होणारी गाडीतील स्वयंचलित ब्रेक यंत्रणा सुरू झाली आणि गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. हा प्रकार दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. ही गाडी जागीच थांबल्यामुळे मागून येणाऱ्या तीन गाडय़ाही मार्गात थांबल्या. बोरिवली रेल्वे स्थानकातच हा प्रकार घडल्यामुळे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी उसळली होती. जलद मार्गावरील वाहतूक तात्काळ धीम्या मार्गावरील फलाटावर वळविण्यात आली. तरीही वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती. या काळात कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नसल्या तरी २० ते २५ मिनिटे विलंबाने वाहतूक सुरू होती. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या मोटरमनकडून सिग्नल तोडण्याच्या काही घटना अलीकडच्या काळात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
गाडीने ओलांडलेल्या सिग्ननलचा पॉइंट खराब झाल्यामुळे सिग्नल बंद पडला होता. सिग्नल पॉइंटमधील दोष १२.४० वाजता दूर करण्यात आल्यावर वाहतूक पूर्ववत झाली, असे सूत्रांकडून सांगण्यात येत होते.  मात्र ‘ए’ मार्करवर गाडी चालविण्याबाबत कोणतीही सूचना मोटरमनला देण्यात आली नव्हती. तरीही त्याने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader