राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांच्या आवारात मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. वाढलेली सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ही बंदी सरकारला आवश्यक वाटत आहे.
या प्रस्तावावर प्राचार्य व शिक्षक यांची मते मागवण्यात आली आहेत. दरम्यान यावर अंतिम निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही.
उच्च शिक्षण सह संचालकांनी महाविद्यालयांचे प्रमुख व शिक्षक यांना मे महिन्यात याबाबत पत्र पाठवले असून त्यांची मते मागवली आहेत. मोबाइलवर बंदी घालताना विद्यापीठे व शैक्षणिक संकुलात जॅमर व डिकोडर लावण्याची तरतूद करावी असे सरकारचे मत आहे.
तंत्र शिक्षण सहसंचालकांनी हे पत्र शिक्षण संस्था व विद्यापीठांना पाठवले आहे. औरंगाबादचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशोक लाड यांनी याबाबत सादरीकरण केल्यानंतर हे पत्र पाठवण्यात आले होते.
हा प्रस्ताव अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून कुठलाही निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही. लाड यांनी मंत्री राजेश टोपे यांना लिहिलेल्या पत्रात सायबर गुन्ह्य़ांवर चिंता व्यक्त केली होती.
काही विद्यार्थी वर्गात व शिक्षण संस्थांच्या परिसरात अश्लील चाळे करून त्याचे चित्रण करतात किंवा छायाचित्रेही घेतात, असा दावा लाड यांनी केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा