जे काही झाले, त्यानंतर ‘यापुढे ‘फेसबुक’चे नावच काढणार नसल्याचे शाहीन धाडा हिने म्हटले आहे तर तिच्या प्रतिक्रियेवर ‘लाईक’ करणाऱ्या रेणू श्रीनिवास हिनेही, ‘फेसबुक’वर कुठलीही प्रतिक्रिया देताना दोनवेळा तरी विचार करेन, असे म्हटले आहे. या दोघींबाबत दोन दिवसांत जे काही घडले, त्या धक्क्यातून दोघी अद्याप सावरलेल्या नाहीत. जामिनावर बाहेर पडताच दोघींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या कृतीबाबत त्यांनी  खेदही व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’बाबत ‘फेसबुक’वर शाहीनने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती, तर रेणू त्याला पसंती दर्शवली होती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य ‘फेसबुक’सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन दिल्याच्या आरोपाखाली शाहीन आणि रेणू यांना पालघर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेवरुन सध्या सर्वत्र वादंग माजला आहे. प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस चूक की बरोबर यावर खल माजला आहे. या दोघींनी मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर यापुढे ‘फेसबुक’चे नावही घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अटकेनंतर पोलिसांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. उलट ते आपल्याशी नम्रपणे वागले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आपली अजिबात तक्रार नाही. एवढेच नव्हे, तर ‘फेसबुक’वर आपण जी प्रतिक्रिया दिली त्यासाठी आपण माफी मागतो. परंतु नंतर जे काही झाले ते योग्य नव्हते, असे शाहीनने एकूण घटनाक्रमाबाबत बोलताना सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे महान व्यक्ती होते आणि त्यांच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे, असेही तिने नमूद केले.
रेणूनेही सुटका झाल्यानंतर जे काही घडले त्याबाबत खेद असल्याचे सांगतानाच आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे म्हटले. असे घडायला नको होते. मला स्वप्नातही वाटले नव्हते की मी न्यायालयाचे तोंड बघेन. आम्ही जे काही केले तो गुन्हा नाही. मात्र या घटनेनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रतिक्रिया देताना दोनवेळा विचार करेन.   आपल्याला अटक व्हायला नको होती. आपल्यासोबत जे घडले आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, अशा शब्दांत रेणूने तिच्यावर बेतलेल्या प्रसंग कथन केला.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा