मराठी चित्रपट आणि मल्टिप्लेक्स यांचे नाते दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन मिळण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. केदार शिंदे यांच्या आगामी ‘खो खो’ या चित्रपटासाठीही मल्टिप्लेक्स मिळण्यात अडचणी आल्या. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटला असला, तरी केदार शिंदेला आता वेगळीच खंत भेडसावत आहे. मल्टिप्लेक्स चालक माझ्यासारख्या प्रस्थापित दिग्दर्शकाला स्क्रीन देण्यात एवढी अरेरावी करत असतील, तर इतर नव्या दिग्दर्शक-निर्माते यांची स्थिती काय होत असेल, हा प्रश्न केदारला पडला आहे. विशेष म्हणजे यापुढे मल्टिप्लेक्स योग नसलेल्या दिग्दर्शकांबरोबर लढण्याचा निर्णयही त्याने घेतला आहे.
राज्य सरकारच्या उदार धोरणामुळे मल्टिप्लेक्सला मनोरंजन करातून माफी देण्यात येते. मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवण्यात यावी, असेही वारंवार मल्टिप्लेक्स चालकांना बजावण्यात आले. मात्र तरीही दर वेळी मराठी चित्रपटांच्या नशिबात मल्टिप्लेक्स योग येण्यात असंख्य अडचणी उभ्या राहिल्या. खेदाची बाब म्हणजे मल्टिप्लेक्स चालकांच्या विरोधात मराठी निर्माते आणि दिग्दर्शक कधीच एकत्र येत ठामपणे उभे राहिले नाहीत.
‘खो खो’ची टीम ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आली असता केदार शिंदेला मल्टिप्लेक्स आणि मराठी चित्रपट याबाबत प्रश्न विचारला होता. त्या वेळी, आपल्या चित्रपटांना ही अडचण कधीच न आल्याचे त्याने सांगितले होते. मात्र याच चित्रपटाच्या निमित्ताने केदारला या अडचणीचा सामना करावा लागला. मल्टिप्लेक्स चालकांनी खेळ देण्यास नकार दिल्यानंतर केदारने लागलीच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे धाव घेतली. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘खळ्ळ खटॅक’ भाषा केल्यानंतर पुन्हा एकदा मल्टिप्लेक्स चालक वठणीवर आले. त्यामुळे आता ३१ मे पासून ‘खो-खो’ला ‘मैदान’ मोकळे मिळाले आहे.
असे असले, तरी केदार शिंदेच्या मते या समस्येवर ताबडतोब उपाययोजना व्हायला हवी. आज आपल्या ओळखी आहेत आणि आपण राज ठाकरे यांच्याशी थेट संपर्क करू शकलो म्हणून आपल्याला हे खेळ मिळाले. मात्र इतर छोटे निर्माते नक्कीच मरत असणार, असा साक्षात्कार केदारला झाला आहे. विशेष म्हणजे याआधी आपण कधीच या प्रश्नाबाबत आक्रमक झालो नव्हतो. मात्र यापुढे चांगल्या चित्रपटांची अशी अडवणूक झाल्यास त्या दिग्दर्शकाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असेही त्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा