मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीची अजिबातच गरज नसून त्याच्या पाचपैकी केवळ एका कप्प्यात लहानशा दुरुस्तीची गरज आहे असे मत या जलाशयाची पाहणी करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लवकरच या समितीमधील आठ जणांची बैठक होणार असून अंतिम अहवाल पालिका प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयाची सोमवारी अंतर्गत पाहणी केली. या पाहणीसाठी जलाशयातील कप्पा क्रमांक एक पूर्ण रिक्त करण्यात आला होता. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेने आय. आय. टी. पवईचे चार प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने ७ डिसेंबरला जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी केली होती. त्यानंतर काल सोमवारी
सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी केली. जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती करायची या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरण : भाजपा आमदार तामिळ सेल्वन यांची शिक्षा उच्च न्यायालयाकडून स्थगित

या समितीमधील एक तज्ज्ञ अल्पा सेठ यांनी सांगितले की, जलाशयात वन ए, वन बी, वन सी आणि टू ए, टू बी असे एकूण पाच कप्पे आहे. या सर्व कप्प्यांची पाहणी आता पूर्ण झाली आहे. त्यापैकी सर्व कप्पे अतिशय सुस्थिती असून त्याच्या पुनर्बांधणीची अजिबातच गरज नसल्याचे आम्हाला वाटते. अन्य तज्ज्ञांचेही साधारण असेच मत आहे. मात्र आम्ही पुन्हा एकदा यावर चर्चा करू आणि मग अहवाल देऊ, असेही त्या म्हणाल्या. या जलाशयात कुठेही आम्हाला गळती किंवा ओलावा देखील फारसा दिसला नाही. १३५ वर्षांपूर्वी बांधलेले हे जलाशय आजकालच्या बांधकामापेक्षा खूपच चांगल्या दर्जाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ कप्पा क्रमांक वन सी मध्ये काही प्रमाणात गंज लागल्याचे त्या म्हणाल्या. त्याकरीता किरकोळ दुरुस्ती करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम

जलाशयाच्या स्थितीचे वर्णन करताना त्या म्हणाल्या की, एखाद्या रुग्णाला आजाराच्या थोड्याफार कुरबुरी असतील तर त्याला उपचारांची गरज असते. इथे मात्र थेट अवयव प्रत्यारोपणाचा प्रस्ताव असल्यासारखे पालिकेने पुनर्बांधणीचा प्रस्ताव ठेवला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need for reconstruction of malabar hill reservoir only one in five compartments needed minor repairs mumbai print news ssb