लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल या तीन पुलांच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेला कळवले आहे. रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई शहर भागातील पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील (महारेल) अधिकाऱ्यांची बुधवार, १५ मे रोजी संयुक्त बैठक पार पडली. मुंबई शहरात सुरू असलेली पुलांची कामे वेगाने, तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या बैठकीत दिले.
आणखी वाचा-सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी महारेराची नियमावली लागू
मुंबई महानगरपालिका आणि महारेल यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामात समन्वय असावा, जेणेकरून नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. तसेच पुलांच्या पुनर्बांधणी कामांदरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुंबई शहर भागातील जीर्ण पुलांची दुरूस्ती आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका आणि महारेलने संयुक्तपणे रेल्वेवरील पुलांची कामे हाती घेतली आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, उप प्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (व्यवसाय विकास आणि वित्त) सुभाष कवडे, महारेलचे व्यवस्थापक (नियोजन) जितेंद्र कुमार, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक असीतकुमार राऊत, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक श्रीरामगिरी श्रीकांत आदी उपस्थित होते.
मुंबईत रेल्वे मार्गांवर असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो. प्रत्यक्ष पूल उभारणी प्रकल्पाची कामे ही महारेलमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल (दादर) आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
तीन पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मंजुरी
मुंबई शहरातील करी रोड पूल, माटुंगा (रेल्वे खालील पूल), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजुरी देण्यात आली. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे.
तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच
ऑलिवंट, ऑर्थर आणि एस (भायखळा) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेने २४ एप्रिल २०२४ रोजी महापालिकेला पत्र पाठविले आहे. हे पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणीची आवश्यकता नाही असे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.
आणखी वाचा-नोटीशीनंतरही महाकाय जाहिरात फलक कायम; पालिकेच्या नियमावलीस मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा हरताळ
मुंबई शहरातील चार पुलांच्या कामाची सद्यस्थिती
- रे रोड पूल – ७७ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
- भायखळा पूल – ४२ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
- टिळक पूल – ८ टक्के काम पूर्ण.
- घाटकोपर पूल – १४ टक्के काम पूर्ण.