मुंबई : चीनमध्ये नव्याने सापडलेल्या करोनाचा ‘बीएफ ७’ या विषाणूचा जगभरात प्रसार होत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र करोनाचा नवा विषाणू ‘बीएफ ७’ भारतासाठी फारसा घातक ठरणार नाही. त्यामुळे या विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> मुंबई: कोविशिल्डच्या तुटवड्यामुळे नागरिक वर्धक मात्रेच्या प्रतीक्षेत
चीनमध्ये थैमान घालणाऱ्या ‘बीएफ ७’ हा विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतामध्येही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र भारतातील नागरिकांना ‘बीएफ ७’ला घाबरण्याची आवश्यकता नाही. भारतामधील ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तसेच भारतातील लस ही परिणामकारक आहे. त्यामुळे ‘बीएफ ७’चे रुग्ण भारतामध्ये सापडले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला करोना राज्य कृती दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिला आहे.
हेही वाचा >>> करोनाच्या नव्या व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही १० उपकरणं; जाणून घ्या किंमत आणि उपयोग
भारतातील लसीच्या तुलनेत चीनमधील लस ही फारशी परिणामकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. तसेच चीनमधील फार कमी नागरिकांचे लसीकरण झाले होते. याउलट भारतामध्ये ९५ टक्के नागरिकांनी करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तसेच अनेकांनी लसीची वर्धक मात्राही घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये करोनाचा सामना करण्याची रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. तसेच ‘बीएफ ७’ या विषाणुमुळे आलेली लाट ही दुसरी लाट आहे, तर भारतामध्ये करोनाच्या तीन लाट येऊ गेल्या आहेत. चीनमध्ये ही दुसरीच लाट आहे. आपण त्याच्या पुढील टप्प्यात पोहोचलो आहे. त्यामुळे चीनमध्ये सापडलेल्या या नव्या विषाणूची भारतामध्ये किती मोठी लाट येईल, हे सांगणे अवघड असले तरी त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही.
हेही वाचा >>> COVID विषयी Whatsapp वर माहिती शेअर केल्यास भरावा लागेल दंड? PIB ने दिलेलं उत्तर नीट वाचा
या नव्या विषाणुमुळे रक्तदाब, मधुमेह असे सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा नागरिकांना धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची माहिती नवी मुंबई करोना कृती दलाचे सदस्य डॉ. भरत जगियासी यांनी दिली. ‘बीए ७’चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी भारतामध्ये तो फारसा घातक ठरणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र बेफिकीर न राहता मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे यांसारख्या आवश्यक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगतले. भारतामध्ये आलेल्या करोनाच्या तीन लाटांमुळे आपली आरोग्य यंत्रणा करोनाशी लढा देण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.