शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिवस आहे. या निमित्त शिवतीर्तावरील स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी सुरू आहे. तर शिंदे गटाकडून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस म्हणेज कालच अभिवादन करण्यात आलं. मात्र यानंतर शिवसेना(ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटात काहीसी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर जाऊन स्मृतिस्थळास अभिवादन केलं. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे गटावर निशाणा साधला. या प्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा – … ते पाहिलं की असं वाटतं त्यांनी या स्मृतिस्थळावर येऊच नये – अरविंद सावंत
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख केवळ शिवसेनाप्रमुख नव्हते, त्यांच्यामध्ये विविध पैलू होते. आजचा हा स्मृतिदिन मला थोडासा वेगळा का वाटतोय? कारण, दहा वर्षे लागली काहीजणांना शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख कोण होत हे समजायला. आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळ हा बाहेर आलेला आहे.”
याशिवाय “अनेक शिवसेनाप्रेमी आहेत, शिवसेनाप्रमुख प्रेमी आहेत. त्यांनीही त्यांचं प्रेम आणि भावना व्यक्त करायला काही हरकत नाही. मात्र ते करताना याचा कुठे बाजार होऊ नये ही माझी नम्र भावना आहे. त्या दृष्टीने विचार करूनच बाजारूपणा कशामध्ये दिसता कामानये. कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते, कृतीतूनही विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार हा विचार राहत नाही केवळ एक बाजारूपणा येतो. म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये. त्यांच्याबद्दलच्या तुमच्या श्रद्धा, भावना, प्रेम हे सगळं समजू शकतो पण त्याला साजेसं काम आपण करावं, एवढच माझी त्यांना विनंती आहे.” असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.