दहशतवाद विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहेत. या परिषदेस अनेक देशांचे प्रतिनिधी आलेले असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या परिषदेत सहभाग नोंदवला. यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दहशतवाद संपवणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांनीच सहभाग नोंदवला आहे. आज आपण पाहत आहोत की आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही हरियाणात अशाचप्रकारे आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व राज्यांचे गृहमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आपण सर्वजण मिळून दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहोत.”
याचबरोबर “२६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही. तो दिवस आपल्या सर्वांसाठी काळा दिवस होता. तो कोणीच विसरू शकणार नाही. याच जागेवर आज एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आपण सर्वजण सोबत आहोत.” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
याशिवाय “ही जी सुरक्षा विषयक दहशतवादविरोधी परिषद होती. ती अतिशय महत्त्वाची होती. मी सर्वच संयुक्त राष्ट्राचे सदस्य व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की मुंबईत ताज हॉटेलमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं. यामध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर हेही सहभागी झालेले होते. विविध देशांचे प्रतिनिधी होते आणि दहशतवाद विरोधातील लढाई आपण सामूहिकपणे लढतो आहोत व हे गरजेचंही आहे.” अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यामांना दिली.