ओशिवरा येथील गोळीबारात ठार झालेले व्यावसायिक एझाज खान यांच्या हत्येप्रकरणात अज्ञाप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी विविध शक्यता गृहीत धरून रविवारी अनेकांची चौकशी केली. मिल्लत नगर येथे शनिवारी संध्याकाळी खान यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
याप्रकरणी माहिती देतांना ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप रुपवते यांनी सांगितले की, आम्ही मालमत्तेचा वाद, व्यावसायिक संघर्ष तसेच वैयक्तिक वैमनस्य अशा तीन शक्यतांवर तपास करीत आहोत. याप्रकरणी रविवारी दिवसभर अनेकांची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरुन हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खान यांना रुग्णालयात नेणाऱ्या लोकांची तसेच त्या परिसरातल्या अनेकांची चौकशी करुन हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंधेरीच्या मिल्लत नगर येथे राहणाऱ्या एझाज अहमद खान (४५) यांचा चीनी उत्पादने आयात करण्याचा व्यवसाय होता. खान हे आई, वडील तसेच तीन भावांसह एकत्र कुटुंबात राहत होते. त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader