घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील पूलउभारणीला अडीच वर्षे विलंब; खर्चात वाढ होऊनही कारवाईबाबत पालिकेचे मौन

इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर नव्याने खुल्या करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबई-नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जलद होईल, अशी पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई महापालिकेला या पुलाच्या उभारणी प्रक्रियेतील विलंबाचा पूर्णपणे विसर पडला आहे. अडीच वर्षे मुदतीत काम पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या पुलाच्या कामात दोन वेळा मुदतवाढ आणि खर्चात वाढ होऊन पाच वर्षे लागली. मात्र, नियमानुसार विलंबाबद्दल ठेकेदाराकडून दंडवसुली करण्याबाबत पालिकेने मौन बाळगले आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू होते. या कामामुळे परिसरातील रहिवाशांना गेल्या काही वर्षांपासून मनस्ताप सोसावा लागत होता, अनेक अपघात या भागात झाले होते. अशात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या पुलाच्या उपयुक्ततेबद्दल पालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, पुलाच्या कामातील दिरंगाईबाबत बोलायला तयार नाही.  डिसेंबर २०१६ मध्ये या कामासाठी पालिके ने निविदा प्रक्रिया सुरू के ली होती. हे काम जुलै २०१९ला पूर्ण होणे अपेक्षित होते. दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर हे काम ऑक्टोबर २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्याकरिताही नऊ महिने उशीर झाला असून जुलै २०२१ मध्ये हे काम पूर्ण झाले आहे.

पहिल्या वेळी मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम वेळेत झाले नव्हते. त्या वेळी पूल विभागाने कंत्राटदाराला ४० लाख रुपये दंड के ला होता. मात्र त्याचीही वसुली अद्याप झालेली नाही. कंत्राटदाराला अंतिम देयक देताना त्यातून काही वसुली असल्यास ती केली जाते, असे पूल विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दोन वेळा मुदतवाढ

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च दोन वेळा वाढविण्यात आला होता. कंत्राटदारास मूळ कंत्राटाचा कार्यादेश २ जानेवारी २०१७ रोजी देण्यात आला. पावसाळा धरून तीस महिन्यांत म्हणजे जुलै २०१९ पर्यंत काम होणे गरजेचे होते. पहिल्या वाढीव प्रस्तावात ११ सप्टेंबर २०१९ रोजी स्थायी समितीने अतिरिक्त व जादा कामांचा अंतर्भाव करून पूर्णत्वाचा कालावधी ३० मे २०२० पर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा ५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रशासनाने द्वितीय फेरफार अंतर्गत कालावधी ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविला होता. हा कालावधीही पूर्ण करता आलेला नाही.

पुलाविषयी माहिती

१) घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यांवर  नेहमी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा उड्डाणपूल बांधण्यात आला.

२) हा उड्डाणपूल शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा तीन मोठय़ा नाल्यांवरून जातो.

३) पुलाची एकूण लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत.

पालिका अधिकारी म्हणतात, टाळेबंदीमुळे कामात दिरंगाई

टाळेबंदी व करोनामुळे काम रखडल्याचे पूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मूळ पुलाचे बांधकाम २.१ किमीचे होते. मात्र दुसऱ्या मुदतवाढीच्या वेळी या पुलाची लांबी वाढवण्यात आली होती. त्यामुळे खर्च व वेळ वाढवून मागण्यात आली होती. मात्र करोनामुळे व

टाळेबंदीमुळे कामगार मिळत नसल्यामुळे हे काम रखडल्याचे पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी सांगितले. एखाद्या कामाला उशीर का झाला त्याची कारणे नैसर्गिक होती की खात्याच्या दिरंगाईमुळे की कंत्राटदाराच्या चुकीमुळे उशीर झाला हे पाहून दंड के ला जातो, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader