पावसाने देशाच्या वायव्य भागातून निरोप घेतला असतानाच गणेश आगमनासोबत संपूर्ण राज्यात पुनरागमन करून दुष्काळाची तीव्रता कमी केलेला पाऊस गणेश विसर्जनासोबतच निरोप घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय वेधशाळेकडून त्याबाबत अधिकृत घोषणा केली गेली नसली तरी पाऊस परतण्याची शक्यता धूसर झाली आहे. आजमितीला देशभरात पावसाची तूट १३ टक्के असून राज्यात २५ टक्के पाऊस कमी झाला.
राजस्थानमधून ४ सप्टेंबर रोजी म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या महिनाभर आधीच मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. मात्र त्यानंतर मध्य भारतापासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण राज्यात पावसाचे पुनरागमन झाले. गणेशोत्सव सुरू होण्याआधी दोन दिवस सुरू झालेल्या पावसाने त्यानंतरच्या आठवडाभरात राज्यासह गुजरात, राजस्थान व उत्तरेतही मुसंडी मारली. मात्र हा प्रभाव आता ओसरला आहे. ईशान्य भारत व दक्षिण भारताच्या टोकाला पाऊस पडत असला तरी देशाच्या इतर भागांतून काळ्या ढगांनी माघार घेतली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता दुरावली आहे. केंद्रीय वेधशाळेच्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार ईशान्य आणि दक्षिण भारत वगळता इतरत्र वातावरण कोरडे राहणार आहे.
कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्र वगळता पुढील आठवडय़ात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातही केवळ काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.आजमितीला कोकणात ३० टक्के, मध्य महाराष्ट्रात ३० टक्के, मराठवाडय़ात ३७ टक्के, तर विदर्भात १० टक्के तूट आहे. गणेशोत्सवादरम्यान पडलेल्या पावसाने दुष्काळावर फुंकर मारली गेली असली तरी पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. मुंबईत सप्टेंबरच्या सरासरीच्या ६० टक्केच पाऊस पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा