मुंबई / ठाणे : जून अखेरीस आठवडाभर तारांबळ उडवणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरात काहीशी विश्रांती घेतली आहे. मुंबई शहरात रविवारी शून्य मिमी, तर उपनगरात ९ मिमी पावसाची नोंद झाली. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, राज्यभर १२ ते १४ जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मोसमी पावसाने महिन्याभराची सरासरी गाठली. जुलैमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. मुंबई आणि उपनगरात आभाळ भरून येते मात्र, पाऊस पडत नाही. रविवारी उपनगरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.
ठाणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. भिवंडी, डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. ठाणे शहरात मात्र पावसाने उघडीप दिली. खोपट येथील आंबेडकर रोड परिसरात झाडाची फांदी तुटली. भिवंडीत पावसामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. कल्याण-डोंबिवली भागातही पावसाची नोंद करण्यात आली. बदलापूर अंबरनाथ येथील ग्रामीण आणि शहरी भागात सकाळपासून पावसाचा जोर होता. दुपारनंतर त्याने उसंत घेतली. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली होती.
अंदाज काय?
राज्यभर १२ ते १४ जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर कमी असेल, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. या आठवडय़ात कमाल तापमानात वाढीची शक्यताही आहे.
वांद्रे येथे महिला बुडाली
वांद्रे येथील समुद्रात रविवारी संध्याकाळी २७ वर्षीय महिला बुडाली. ज्योती सोनार असे तिचे नाव असून अग्निशमन पथकाचे जवान रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेत होते. समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.
मुंबईतील पर्यटकांचा लोणावळ्यात मृत्यू
लोणावळा : वरसोली गावात खाणीतील पाण्यात बुडून मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रियांक पानचंद व्होरा (३५, रा. पवई), विजय सुभाष यादव (३५, रा. घाटकोपर) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रियांक, विजय व जेनिया वियागस हे तिघे खाणीतील पाण्यात उतरले. पाय घसरल्याने ते बुडाले. बाहेर असलेल्या मित्रांनी आरडोओरड करून ग्रामस्थांना बोलावले. तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र प्रियांक आणि विजयचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.