सुट्टीकालीन किंवा उत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ांना यापुढे स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात येणार नाही. नेहमीच्या गाडय़ांना असलेल्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाच या गाडय़ांमध्ये प्राधान्याने सामावून घेतले जाणार आहे. गणेशोत्सव विशेष गाडय़ांच्यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी रेल्वेच्या वाणिज्य विभागास आणि सुरक्षा यंत्रणेस आरक्षणाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काही दलालांवर कारवाई करण्यात आली होती. सध्या दिवाळीनिमित्त विशेष गाडय़ा सोडण्यात येत असून तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून या गाडय़ांचे स्वतंत्र आरक्षण बंद करण्यात आल्याची माहिती महाव्यवस्थापक जैन यांनी दिली. विशेष गाडय़ांमध्ये नियमित गाडय़ांच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या स्थानकावर जाऊन तेथे  प्रतीक्षा क्रमांक असलेले तिकीट परत केले की त्याबदल्यात विशेष गाडीचे आरक्षित तिकीट त्या प्रवाशाला देण्यात येईल. त्यामुळे नियमित गाडीची प्रतीक्षा यादी कमी होईलच पण वैध प्रवाशालाच आरक्षण मिळू शकेल, असे जैन यांनी सांगितले.

Story img Loader