मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा; सत्ताधाऱ्यांमध्ये फुटीचा प्रयत्न
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी सरकारला कोणताही धोका नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. या विषयावर विरोधकांनी आरोप केले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कायमच विदर्भाच्या मुद्दय़ावर दुटप्पी भूमिका घेतल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून केवळ काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेच नव्हे तर सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेनेही भाजपची कोंडी केली आहे.
विधान परिषदेत नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी हे सरकार अल्पमतात गेल्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. भ्रष्ट मंत्र्यांचे घोटाळे झाकण्यासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लोकसभेत भाजपच्या खासदाराच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याची गरज असून सरकारच्या होणाऱ्या बदनामीपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काढण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडवा, अशी विरोधकांची मागणी असून शिवसेनाही या मुद्दय़ावर विरोधात असल्यामुळे हे सरकार अल्पमतात गेल्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
विरोधकांची दुटप्पी भूमिका
मूळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विदर्भातील जनतेला हवे असल्यास विदर्भ स्वतंत्र करण्यास विरोध नसल्याचे शरद पवार सांगतात आणि त्यांच्याच पक्षाचे नेते विधानसभेत वेगळे राजकारण करतात. काँग्रेसने तर विदर्भाचा ‘वसाहतवादा’सारखा वापर केला आहे. ब्रिटिशांनी जशी वसाहतींना वागणूक दिली त्याचप्रमाणे काँग्रेसने विदर्भाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर केला.स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा सर्वस्वी केंद्राच्या अखत्यारीतील विषय असून राज्य विधिमंडळात त्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. विरोधकांनी सेना-भाजपमध्ये फूट पाडण्याचा कितीही उद्योग केला तरी तो यशस्वी होणार नाही. हे सरकार यापुढेही काम करत राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.