मुंबई : मुलुंडमधील हरिओम नगरातील रहिवाशांना लवकरच पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड पथकर नाक्यावरील पथकरातून सूट देण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या आहेत. या नगरातील रहिवाशांना पथकरातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असा दावा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
हरिओमनगर हा मुंबई महापालिकेचा भाग असूनही तो मुलुंड पथकर नाक्याच्या पलीकडे (ठाण्यात) येत असल्यामुळे या रहिवाशांना मुंबईत ये-जा करण्यासाठी पथकर द्यावा लागतो. लोकांची ही अडचण सोडविण्यासाठी आपण काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हरी ओम नगरमधील रहिवाशांची पथकारातून सुटका करण्याची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार एमएसआरडीसीने हरिओम नगरातील रहिवाशांना पथकर माफीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे.
हेही वाचा >>> पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती
सध्या हरी ओम नगरच्या रहिवाशांना एकूण पथकार दराच्या फक्त २५ टक्के रक्कम भरल्यानंतर मासिक पथकर पास मिळतो. सामान्य प्रवाशांसाठी, एका पथकर नाक्याचा मासिक पास १४१० रुपये आहे. तर हरी ओम नगर रहिवाशांसाठी तो फक्त ३५३ रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही पथकर नाक्यांसाठी सामान्य लोकांसाठी १६०० रुपये आणि हरी ओम नगर रहिवाशांसाठी ४०० रुपये मासिक पास आहे. मात्र हरिओम नगरमधील रहिवाशांना संपूर्ण पथकर माफी देण्याबाबतचा निर्णय शासनाने घ्यावा आणि त्याची नुकसानभरपाई महामंडळाला देण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. आमदार झाल्यापासून आपण या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल आणि या नगरामधील सुमारे १० हजार रहिवाशांची पथकरातून सुटका होईल असा दावा कोटेचा यांनी केला.