जोरदार पावसात पाण्याने भरलेले मोठमोठाले खड्डे चुकवीत विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणे जिकिरीचे असल्याचे सांगत रस्त्यावर पाणी भरलेले असताना शाळेच्या बसगाडय़ा रस्त्यावर न उतरविण्याचा निर्णय मुंबईतील स्कूल बसचालकांनी घेतला आहे. त्यामुळे अशी वेळ उद्भवल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत नेण्याची वा आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, प्रसंगी त्यासाठी कार्यालयाला बुट्टी मारण्याची तयारी ठेवावी लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील काही ठिकाणे खराब रस्त्यांकरिता ओळखली जातात. जुहू सर्कल, साकीनाका, पवई, म्हाडा वसरेवा टेलिफोन एक्स्चेंज, चारकोप, ठाकूर कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे असल्याने पावसाळ्यात वाहने चालविणे कठीण होते. त्यातून भरती असल्यास रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांची ने-आण करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून जोरदार पाऊस आणि भरती अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास रस्त्यावर बसगाडय़ाच उतरविणार नसल्याचा पवित्रा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अध्यक्ष अनिल गर्ग यांनी घेतला आहे. ‘एसबीओए’शी संबंधित मुंबईत जवळपास १० हजार स्कूल बसचालक आहेत. त्यामुळे पालकांची मोठी अडचण होणार आहे.
‘मोठमोठाल्या खड्डय़ांमध्ये गाडय़ा गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान होते. याशिवाय इतक्या पावसात अशा रस्त्यांवरून विद्यार्थ्यांची ने-आण करणे हा त्यांच्या जिवाशी खेळ ठरतो. अशा वेळेस खरेतर सरकारनेच सुट्टी जाहीर करायला हवी. परंतु शिक्षण विभाग आणि शाळा सुट्टी जाहीर करीत नाहीत आणि मधल्यामध्ये आम्ही भरडले जातो. कारण उद्या काही अपघात झाला तरी आम्हालाच त्याकरिता जबाबदार ठरविले जाते,’ अशा शब्दांत बसचालकांनी आपली अडचण मांडली. बसचालकांनी असे अचानक असहकाराचे धोरण स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना होणाऱ्या मनस्तापाबाबत विचारले असता, शाळांनी अशा वेळेस पालकांशी एसएमएस किंवा दूरध्वनीमार्फत संपर्क साधून त्यांना सूचना द्याव्या. अनेक आणीबाणीच्या प्रसंगी शाळा तसे करतात. त्यामुळे आम्ही बस रस्त्यावर न उतरविण्याचे ठरविले तरी त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप होणार नाही, असे गर्ग यांनी सांगितले.

Story img Loader