अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याइतपत ठोस पुरावेच हाती आलेले नाहीत, अशी कबुलीच तपासाशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मनोज नागोरी आणि विकास खंडेलवाल हे तांत्रिकदृष्टय़ा या प्रकरणात अटकेत असले तरी त्यांच्याकडून फारसे काहीही हाती लागलेले नाही. कदाचित त्यामुळेच राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अटक केली नसावी, असे मतही या अधिकाऱ्याने व्यक्त केले.
डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर मारेकरी मोटरसायकलवरून पसार झाले. या प्रकरणातील अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेजही मिळाले. परंतु प्रत्यक्षात तपासात काहीही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. राज्याचा दहशतवादविरोधी विभाग तसेच मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभागही या मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. परंतु यापैकी कुणाच्याच हाती ठोस लागलेले नाही, असेही या यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत मारेकरी हाती लागले पाहिजेत, असाच आमचा आग्रह आहे. त्यासाठी खबऱ्यांचे जाळेही पसरविण्यात आले आहे. परंतु ठोस काहीही हाती लागलेले नाही, अशी कबुलीही या यंत्रणांनी दिली आहे.
नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडे सापडलेली ७.६५ एमएमची पिस्तुले आणि काडतुसे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सापडलेली काडतुसे एकच आहेच. हे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशीच स्पष्ट झाले होते. परंतु या व्यतिरिक्त काहीही पुरावे मिळाले नव्हते, असेही एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader