मुंबई : भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मेकॉलेने भारतातील शिक्षणपद्धती बदलण्याचा विचार इंग्रजांसमोर मांडला. भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून इंग्रजीच्या मदतीने दूर केल्यावर ते आपोआप आपल्या मुळांपासून दुरावतील, असा त्यांचा विचार होता. त्यानुसार इंग्रजांनी ‘भूतकाळापासून तोडणे’ या तत्त्वाचा अवलंब करून इंग्रजीचा प्रभाव वाढविला. इंग्रजीचे प्रस्थ वाढल्यामुळे इथे नवनिर्मित विचारच होत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी व्यक्त केले.
मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी नेमाडे बोलत होते.
हेही वाचा >>> मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोस्टल रोडबाबत मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, म्हणाले जानेवारी महिन्यात…
समाजातल्या अधिकाधिक निरक्षर लोकांमुळे आज मराठी टिकून आहे. मातृभाषा ही मानवाची ओळख असून ती संपली तर त्याच्या अस्तित्वाला फारसा अर्थ उरणार नाही. समाजात संस्कृती आणि परंपरा केवळ मातृभाषेमुळेच अबाधित आहे. मात्र दुर्दैवाने आज इंग्रजीचे प्रस्थ वाढले असून मातृभाषेची पडझड सुरू झाली आहे. त्यामुळेच तिला टिकविण्यासाठी धडपड करायला हवी. मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे. भारतातील नृत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत आदी कलेच्या वैभवाला जगात तोड नाही. मात्र भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्यात आपण मागे पडलो. आजतागायत मातृभाषा जोपासणे आपल्याला जमलेले नाही. मातृभाषा नीट जपली नाही, संबंध देशाची काय भाषा हवी, हे ठरलेले नाही. परकीय भाषा शिकायचीच असेल तर केवळ कामापुरती शिकावी. ती उत्तम यायला हवी यात वाद नाही, पण फक्त तीच यायला हवी याचा अट्टहास नसावा, असेही नेमाडे यावेळी म्हणाले.
‘मराठी शाळांना प्रयोगशील करण्यासाठी प्रयत्न आवश्यक’ मराठी भाषा आणि शाळेसंदर्भात कोणतीही योजना घेऊन शासनदरबारी गेल्यास अनेक महिने शासनकर्त्यांची भेटीची वेळ मिळत नाही. केवळ मराठी भाषेतून शिक्षण झाल्यामुळे अनेक पात्र शिक्षकांना उच्चविभूषित शाळांमध्ये नोकरी नाकारली जाते. मराठीचा संघर्ष कितीही मोठा असला तरी एका बाजूला संघर्ष आणि दुसरीकडे रचनात्मक काम सुरूच राहील. मराठी शाळांना अधिकाधिक उत्तम, प्रयोगशील करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत चिन्मयी सुमीत यांनी व्यक्त केले.