मुंबई : कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने किंवा मंत्रालयात येऊन होणार नाही, ती गुणवत्तेनुसारच होईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिला.
बावनकुळे यांनी राज्यातील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या आहेत. सर्वांचे गोपनीय अहवाल बघूनच अ, ब, क असे निकष ठरवले आहेत. जनतेशी संपर्क, कामे, निकाली काढलेल्या सुनावण्या हे तुमच्या बदलीचे निकष असतील. राजकीय दबावाला जुमानणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पाणंद रस्ते, सातबारा, महाराजस्व समाधान शिबीर, सलोखा योजना आणि वाळू धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचे शासनाचे नियोजन आहे. शेवटच्या नागरिकापर्यंत लाभ व सुविधा द्यायच्या असून त्यात हयगय खपवून घेणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक अधिकाऱ्याने जनतेला आपल्या कार्यालयात भेटीची वेळ ठरवावी व तसा फलक कार्यालयासमोर लावावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.