मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी २४ तास कुर्ला व भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून शहर भागात १० टक्के पाणी कपात असेल.
गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी भांडूप संकुल ते मरोशी बोगदापर्यंत रिक्त करावी लागणार आहे. जलवाहिनी रिक्त करून दुरूस्त करण्याचे काम गुरूवार ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते शुक्रवार ५ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत (२४ तासांकरीता) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील शहर भागातील व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील.
हेही वाचा… ‘लॉक अपमध्ये आरोपीचे कपडे का काढता?’ मुंबई पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
यामध्ये चर्चगेट, कुलाबा, ताडदेव, भायखळापासून वरळी दादर माहीम वांद्रे पर्यंतच्या भागात पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. तर कुर्ला परिसरात २४ तासासाठी पाणीपुरवठा बंद राहील. भांडुपमधील बहुतांशी भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. या पाणीकपातीदरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. या कालावधीत पाण्यााचा जपून वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.