जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वानिमित्त भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेने घातलेल्या मांस विक्रीच्या बंदीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. तसेच जैन समुदायावरही निशाणा साधला. मांस बंदीची मागणी म्हणजे अल्पसंख्य समाजाचा हा धार्मिक उन्माद असल्याचे संजय राऊत म्हणाले. कोणी काय खायचे आणि काय नाही खायचे हे ठरवायचे अधिकार यांना कोणी दिला. भारताच्या आर्थिक जडणघडणीत मांस विक्रीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. भारतात आजही ८५ टक्के लोक मांसाहारी आहेत. त्यामुळे जैन बांधवांना आमचे आवाहन आहे की उगाचच बहुसंख्य समाजाशी टक्कर देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्रास होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला.

दरम्यान, ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीने ओवेसी यांनीही मांस विक्रीच्या बंदीवरून भाजपवर शरसंधान केले. एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱयात जाऊन गुंतवणुकीसाठी वातावरण निर्मिती करत असल्याच्या गोष्टी करतात. मात्र, या निर्णयामुळे देशात कशाची वातावरण निर्मिती होत आहे? अशाने कोण येईल भारतात? इतके दिवस कत्तलखाने बंद ठेवल्यास त्यावर रोजगार अवलंबून असणारे लोक काय खाणार? असे सवाल यावेळी ओवेसी यांनी उपस्थित केले.

Story img Loader