बुधवारी दादारमधील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र या दोन्ही मेळाव्यांपैकी कोणत्या दसरा मेळाव्यामध्ये ध्वनीप्रदूषण अधिक होतं यासंदर्भातील अहवाल समोर आला आहे.
नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील मेळाव्यांमधील एकूण आवाज किती होता याबद्दलची माहिती आवाज फाऊंडेशन या संस्थेच्या अहवालामधून समोर आला आहे. आवाज फाऊंडेशनने जारी केलेल्या या अहवालानुसार दसरा मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यातील आवाज हा शिंदे गटातील मेळाव्यापेक्षा अधिक होता हे स्पष्ट झालं आहे. या वर्षातील सर्वाधिक आवाज यंदा दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये होता असं अहवालात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा झालेल्या शिवाजी पार्कमधील सरासरी आवाज हा १०१.६ डेसिबल इतका होता. त्याचवेळी बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा सरासरी आवाज हा ८८ डेसिबल इतका होता.
नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
नेत्यांनी केलेल्या भाषणामध्ये सर्वाधिक आवाज हा मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणादरम्यान होता. पेडणेकरांच्या भाषणाच्या वेळेस शिवाजी पार्कवरील आवाज हा ९७ डेसिबल इतका होता. तसेच शिंदे समर्थक आमदार धौर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज ८८.५ डेसिबलपर्यंत पोहचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा आवाज ८१.७ ते ९१.६ डेसिबल इतका होता. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा आवाज हा ६८.६ ते ८८.४ डेसिबलदरम्यान होता. ठाकरे समर्थक सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा आवाज ७७.६ ते ९३.१ डेसिबलदरम्यान नोंदवण्यात आला. ८७.४ ते ९६.६ डेसिबल इतका आवाज अंबादास दानवे यांच्या भाषणाच्या वेळेस नोंदवण्यात आला.
नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”
या अहवालानुसार २०१९ मध्ये शिवाजी पार्कमध्ये सर्वाधिक म्हणजे ९३.९ डेसिबल इतकं ध्वनीप्रदूषण नोंदवण्यात आलेलं. हीच आकडेवारी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी होती. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे.