उमेदवारी अर्ज आजपासून, मात्र जागावाटपाचा तिढा कायम; नाराजांच्या मनधरणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव

नारायण राणे स्वत: खासदार आणि दोन्ही मुले विधानसभेला उमेदवार अशी घराणेशाही कोकणात बघायला मिळणार आहे.

nomination for assembly elections begins no consent yet on seat sharing in mahayuti and maha vikas
(संग्रहित छायचित्र) फोटो : लोकसत्ता टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज, मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावर अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. भाजपची यादी जाहीर झाल्यावर पक्षातील नाराज नेत्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात पक्ष गुंतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडल्यानंतरही भाजप आणि वंचित आघाडी वगळता अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.

भाजपमधील नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेलापूर मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आलेले गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. उद्या त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा >>> Bhiwandi : भिवंडीत निवडणूक कशी रंगणार? समाजवादी पक्षालाच कौल की शिवसेनेला?

नीलेश राणे यांनाही कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पण महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे) ताब्यात असल्याने ते बुधवारी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे स्वत: खासदार आणि दोन्ही मुले विधानसभेला उमेदवार अशी घराणेशाही कोकणात बघायला मिळणार आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्याकरिता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सायंकाळी नवी दिल्लीत बैठक पार पडली. त्यात बहुतेक विद्यामान आमदारांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

महायुती, आघाडीत चर्चांचा घोळ

महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या जागावाटपावर अजूनही सहमती झालेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला ८० पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने जागावाटप अडल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) अद्याप एकवाक्यता झालेली नाही. विदर्भातील जागांवर चर्चेचे घोडे अडले असून ठाकरे गटाने केलेला दावा मागे घ्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nomination for assembly elections begins no consent yet on seat sharing in mahayuti and maha vikas aghadi zws

First published on: 22-10-2024 at 03:34 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
Show comments