मुंबई : घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याप्रकरणातील संशयीत अर्शद खान याच्याविरोधात स्थानिक न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अर्शद खानचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज नुकताच सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेप्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीकडून अर्शद खानला पैसे मिळाल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. भिंडेकडून खानला एक कोटींहून अधिक रक्कम मिळाली असून जाहिरात फलक लावण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. विशेष तपास पथकाच्या तपासानुसार, भिंडे याच्या कंपनीने १८ वेगवेगळ्या खात्यांमध्ये ८४ लाख रुपये हस्तांतरीत केले होते. त्यामुळे अर्शद खानकडून ती रक्कम पुढे कोणापर्यंत पोहोचली याबाबत गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक तपास करत आहे.

हेही वाचा…केईएम रूग्णालयात नेत्र विभागासाठी ‘मॉड्युलर शस्त्रक्रियागृह’

तपास पथकाने १४ जूनला अर्शद खानची चौकशी केली होती. त्यावेळी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तपास अधिकाऱ्यांनी त्याला २९ जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले, मात्र तो आला नाही. पोलिस त्याच्या घरी गेले असता तो तेथे नव्हता. त्याच्या पत्नीने खानवर मुंबईबाहेर उपचार सुरू असून तो त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी त्याचा मोबाईलही बंद होता. तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. खान संचालक असलेल्या कंपनीतून ही रक्कम कोणापर्यंत पोहोचली याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non bailable warrant issued against arshad khan in ghatkopar billboard collapse case mumbai print news psg