मुंबईतील विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या लढतीमध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन मतदारसंघाचा समावेश होता. त्या म्हणजे ‘मातोश्री’चा समावेश असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार निवडणूक लढवित असलेला वांद्रे पश्चिम मतदारसंघ. वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपचे पारडे जड मानले जात होते. त्यानुसार ‘मातोश्री’चा बालेकिल्ला वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेकडे (ठाकरे) खेचून आणला. तर शेलार हे अपेक्षेप्रमाणे विजयी ठरले. त्याचवेळी उत्तर मध्य मुंबईमध्ये महायुतीचीच सरशी झाली. येथील सहापैकी चार जागा महायुतीने जिंकल्या तर दोन जागांवर मतदारांनी शिवसेनेला (ठाकरे) कौल दिला. एकूणच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या रुपात महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. या मतदारसंघांतील चार आमदार महायुतीचे असून केवळ दोन आमदार महाविकास आघाडीचे आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजना आणि इतर कारणांमुळे महायुतीला सहज विजयी मिळवता आल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपने विद्यामान खासदार पूनम महाजन यांना डावलून ॲड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. महाजन यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाख ३० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. पक्षाने डावल्याने महाजने नाराज होत्या. काँग्रेसने या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवले आणि त्या १६ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. एकूण मतांच्या ४८.९३ टक्के मतदान काँग्रेसला झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र चक्र उलटे फिरले. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचीच सरशी झाली. सहापैकी चार जागा महायुतीने जिंकल्या, तर केवळ दोन जागांवर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचा खासदार या भागात असताना चांदिवली आणि वांद्रे पश्चिममधील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून याआधी सलग दोन वेळा शेलार विजयी झाले असून त्यांनी दहा वर्षांत येथे जनसंपर्क वाढवला आहे. त्यांनी मोठ्या संख्येने विकासाची कामे केल्याचा दावा आहे. त्यामुळे या मतदारसंघात शेलार यांचा विजय होईल, अशी सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा होती. शेलार यांचे पारडे जड असले तरी यावेळी त्यांना काँग्रेसच्या झकेरिया यांनी आव्हान दिले होते. शेलार २०१९ मध्ये २६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र झकेरिया यांच्या आव्हामुळे शेलार यांचे मताधिक्य कमी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी शेलार यांचा १९ हजार ९३१ मताधिक्याने विजय झाला. त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.
हेही वाचा – दक्षिण मुंबई : तीन मतदारसंघांत उद्धव ठाकरेंचे वर्चस्व कायम, भाजपची तटबंदी अभेद्य
हेही वाचा – वायव्य मुंबई : वर्सोवा पुन्हा ठाकरेंकडे, तर अंधेरी पूर्व एकनाथ शिंदेकडे
दुसरीकडे वांद्रे पूर्व मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे परिवार मतदार असलेल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे नेहमीप्रमाणेच सर्वांचे लक्ष होते. येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे) नवख्या उमेदवाराला अर्थात वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या समोर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) झिशान सिद्दीकी यांचे आव्हान होते. मुळात आमदार असलेल्या सिद्दीकी यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांचा विजय होईल असे मानले जात होते. त्यातच त्यांच्या वडिलांच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट होती. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या सिद्दिकी यांनी निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करून उमेदवारी मिळवली. या मतदारसंघासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपही इच्छुक होते. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) गेल्याने काहीशी नाराजी होती. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या तृप्ती सावंत यांनी अचानक मनसेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत झाली.