महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ईशान्य भारतीय नागरिकांना वंशवादातून सहन करावा लागणारा त्रास रोखण्यासाठी कडक कायदेशीर तरतुदी केल्या जाणार असून पुढील आठवडय़ात पोलिस व प्रशासन यंत्रणेसाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली जातील, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी येथे जाहीर केले. ईशान्य भारतातील राजकीय नेतृत्व त्या राज्यांचा विकास करण्यात अपयशी ठरल्याने तेथे अतिरेकी कारवाया वाढल्या अशी कबुली देत, पुढील पाच वर्षांत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून या कारवाया संपविल्या जातील असा निर्धार रिज्जीजू यांनी व्यक्त केला.
ईशान्य भारतात हिंसेविरोधात आवाज उठवून लेखणीच्या माध्यमातून संघर्ष करणाऱ्या जेष्ठ पत्रकार पेट्रिशिया मुखीम यांना ‘माय होम इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने ‘वन इंडिया’ पुरस्काराने गौरविले. सुनील देवधर यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था ईशान्य भारतीयांसाठी गेली ९ वर्षे कार्य करीत आहे. या पुरस्काराचे वितरण दादर येथील स्वा.सावरकर स्मारकात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिज्जीजू, मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी उद्योगपती डॉ. मुहम्मद माजीद होते.
दिल्लीचे सरकार आपली दखल घेत नाही, अशी भावना ईशान्य भारतीयांच्या मनात असून शिक्षण, उद्योग व अन्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे तेथील बरेच जण शहरांमध्ये शिक्षण व उपजीवीकेसाठी जातात. त्यावेळी वंशवादातून वाईट वागणुकीचे काही प्रकार होतात. अशावेळी त्यांच्यातील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येतील, असे रिजीजू यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील राज्ये हे भारताचे शेवटचे टोक आहे, असा विचार न करता भारताची सुरुवात येथून होते, हा दृष्टीकोन ठेवला तर चित्र पालटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पावले टाकण्यासही सुरुवात केली असून पाच वर्षांत िहसा संपुष्टात आलेली असेल,असा आशावाद रिजीजू यांनी व्यक्त केला.