मुंबई: करोनाच्या पहिल्या लाटेचा सामाना करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीमधील एकाही डॉक्टरचा समावेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केलेल्या नव्या टास्क फोर्समध्ये नसल्यामुळे आरोग्यक्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘नवा विषाणू नवा टास्क फोर्स’ अशी टिप्पणी जुन्या टास्क फोर्समधील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी केली आहे. गंभीर बाब म्हणजे या नव्या टास्क फोर्समध्ये मुंबईतील एकाही डॉक्टरचा समावेश करण्यात आलेला नाही.
कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कृतिदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांचे करोनाविषय प्रमुख सल्लागार म्हणून डॉ. सुभाष साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जुन्या टास्क फोर्समधील सर्वच तज्ज्ञांनी कोणतेही मानधन न घेता निरपेक्षपणे करोनाकाळात काम केले होते. यात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील काही तज्ज्ञ होते. खाजगी रुग्णालयात संसर्गजन्य आजार तसेच मधुमेह तज्ज्ञ असलेले डॉ. राहुल पंडित व डॉ. शशांक जोशी यांचा समावेश होता. मुंबई महापालिकेची सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना करोनाकाळातील मृत्यूंचे विश्लेषण समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
हेही वाचा… दलालांना महारेरा नोंदणीसाठी १ जानेवारीपासून प्रमाणपत्र बंधनकारक; प्रमाणपत्राशिवाय नूतनीकरणही नाही
आता नव्याने करोना रुग्णांची वाढ होऊ लागल्यानंतर तसेच जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नवीन टास्क फोर्सची घोषणा केली. या टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ म्हैसेकर, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील फिजिशियन डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत. यशिवाय आरोग्य विभागाचे आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी जबाबदाऱ्या टास्क फोर्सकडे असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सांगितले.
कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत तसेच संपूर्ण जगासाठी नवीन असलेल्या करोनाशी सामना करण्यासाठी जुन्या टास्क फोर्समधील डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेतली होती. करोनासाठीचे प्रोटोकॉल तयार करण्यापासून उपचाराची दिशा, रुग्णालयीन गरजा, आरोग्य विभाग तसेच महापालिका आणि खाजगी रुग्णालयांचा समन्वय साधून उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनात जुन्या टास्क फोर्समधील डॉक्टरांचा मोठा सहभाग होता. सार्सचा आजार असो की एच १,एन १ ची साथ असो संसर्गजन्य आजारविषयक डॉ. सुभाष साळुंके हे गेली तब्बल ४० वर्षे काम करत आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या प्रत्येक आरोग्य समितीमध्ये त्यांचा आवर्जून समावेश केला जातो व त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जातो. अशा वळी नव्या टास्क फोर्समध्ये जुन्या टास्क फोर्समधील एकाही तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला नसल्याबद्दल आरोग्य क्षेत्रात नाराजी दिसून येत आहे. आरोग्यमंत्र्यांनी करोनासारखा आजार वाढत असताना तरी यात राजकारण आणायला नको होते असे जुन्या टास्क फोर्समधील एका डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
आवश्यकतेनुसार जुन्यांशी समन्वय ठेवू
आताच्या करोना टास्क फोर्समधील सर्वच मंडळी आपपाल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांचा कोविड काळातील अनुभव मोठा आहे. त्यांनी देशपातळीवर काम केले आहे. तसेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. म्हैसेकरांपासून सर्व मंडळींनी करोना काळात काम केलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे आवश्यकतेनुसार जुन्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी आम्ही नक्की संपर्क साधू. करोनाचा सामना हेच आमचे लक्ष्य आहे. लोकांना सर्वोत्तम उपचार मिळणे यालाच आरोग्य विभागाचे प्राधान्य आहे. -आरोग्य आयुक्त धीरजकुमार (सदस्य सचिव टास्क फोर्स)