आजारी असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंगळवारी उपस्थित राहिलो नाही, असा खुलासा करीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांमधून याविषयी दिलेल्या बातम्यांवर बुधवारी टीका केली. केवळ टीआरपीसाठी माध्यमांकडून चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला.
राज्य मंत्रिमंडळात नाराजीच्या ठिणग्या
खडसे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नव्हते. स्वीय सहायकाच्या आणि विशेष कार्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी नाकारल्याने संतप्त झाल्याने खडसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची माहिती माध्यमांमधून प्रसिद्ध झाली. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी त्यांनी आजारी असल्याने बैठकीला न गेल्याचा खुलासा केला.
खडसे आणि मुख्यमंत्री यांच्यात महसूल विभागातील कार्यालयातील नियुक्त्यांवरून वाद भडकला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांचे खासगी सचिव शांताराम भोई, विशेष कार्य अधिकारी मिलिंद हरदास आणि व्ही. टी. माने यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी परवानगी नाकारली. त्यानंतर खडसे मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते.