राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या आदेशाची री ओढत महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनीही यापुढे ‘राज्यपाल महोदय’ असाच राज्यपालांचा उल्लेख करावा, असा आदेश काढला आहे. स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांनंतरही राष्ट्रपती किंवा राज्यपालांचा उल्लेख ‘हिज एक्सलन्सी’ किंवा ‘युवर एक्सलन्सी’ असा केला जात असे. प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदी निवड झाल्यावर नामोल्लेखाची ब्रिटिशकालीन पद्धत बंद केली. राज्यपाल शंकरनारायणन यांनीही आता राष्ट्रपतींचा कित्ता गिरवला आहे. यापुढे पत्रव्यवहार किंवा कार्यक्रमांमध्ये राज्यपालांच्या नावाआधी ‘मा. राज्यपाल’ किंवा ‘राज्यपाल महोदय’, असा उल्लेख करावा, अशा सूचना राजभवनने सर्वासाठी दिल्या आहेत.

Story img Loader