शरद पवार यांची गुगली
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाही, पण या निवडणुकीत सहमतीचा उमेदवार असावा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे संभ्रम कायम ठेवला आहे. पवारांना अपेक्षित सहमतीचा उमेदवार कोण, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला आहे.
शरद पवार यांनाच राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. डाव्या पक्षांनीही सहमतीचा उमेदवार म्हणून पवारांच्या नावाची शिफारस केली आहे. १९९१ मध्ये पंतप्रधानपद थोडक्यात हुकल्याने पवार या वेळी सावध पावले टाकत आहेत. सोमवारी सोलापूरमध्ये बोलताना पवार यांनी आपण राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाही, असे जाहीर केले. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारावरून सहमती घडवून आणावी आणि निवडणूक टाळावी, अशी भूमिका मांडली. सहमतीचे उमेदवार म्हणून पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त होते. पवार यांनी कितीही इन्कार केला तरीही संधी आल्यास ते सोडणार नाहीत, असे राजकीय वर्तुळात मत आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांच्या मतांमध्ये फार काही अंतर नाही. सारे विरोधक एकटवल्यास भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यामुळेच भाजप नेतृत्वाला शिवसेनेपासून साऱ्याच मित्र पक्षांना सांभाळून घ्यावे लागत आहे. राज्यातही भाजपचा शिवसेना विरोध त्यातूनच मावळला आहे.
भाजपने उमेदवारावरून अद्यापही पत्ते खुले केलेले नाहीत. भाजपकडून अन्य कोणाला पाठिंबा देण्यापेक्षा पक्षाच्या नेत्याला पसंती दिली जाईल. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्षांकडून सहमतीने उमेदवार उभा केला जाऊ शकतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधी पक्षाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत जनता दल (यू)चे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिले आहे.