मुंबईत अंदाधुंदपणे उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरविरुद्ध महापालिकेने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले.
मोबाइल टॉवरसंदर्भात महापालिकेने अद्याप नियम बनवलेले नाहीत. तसेच केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे होत नाही. त्यामुळे प्राणी, पक्षी आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईमधील ३५०० पैकी तब्बल १६२८ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. एकाच इमारतीवर पाच-सहा टॉवर उभारण्यात आले आहेत, असे भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिका सभागृहाच्या निदर्शनास आणले. कुल्र्यामध्ये ३५ पैकी केवळ सात मोबाइल टॉवरविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अनुराधा पेडणेकर यांनी दिली.
असीम गुप्ता म्हणाले की, यापुढे एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही. अनधिकृत मोबाइल टॉवरविरुद्ध कारवाई सुरू केल्यानंतर काही मोबाइल कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली असून न्यायालयीन लढाईसाठी पालिकेने चांगला वकील उभा करावा, असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी प्रशासनाला दिले.

Story img Loader