नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करावे, यासाठी पक्षातील विविध नेत्यांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली असली, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.
सुषमा स्वराज याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीच्या योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांच्याच नावाला पसंती दिली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी सुयोग्य असल्याचे म्हटले होते.
राजकोटमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारताविरुद्ध सामना खेळू दिल्याबद्दल शिवसेनेने मोदी यांच्यावर टीका केली होती. नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैनिकांनी निर्घृण हत्या केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. त्यानंतर व्हायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले पाकिस्तानातील २२ नागरिकांचे शिष्टमंडळ गुजरात सरकारने परत पाठविले होते.याचा उल्लेख करून सामना दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, पाकिस्तानाच्या शिष्टमंडळाला परत पाठविणाऱया गुजरात सरकारने पाकिस्तानी क्रिकेट संघालाही राजकोटमध्ये खेळू दिले नसते, तर त्यांच्या देशभक्तीच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा रोवला गेला असता. पाकिस्तानविरुद्धचा लढा लढण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातने एकत्रितपणे काम केले पाहिजे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा