मुंबई: नायगाव बीडीडी चाळीस ‘शरद पवार नगर’ असे नाव महाविकास आघाडीच्या काळात देण्यात आले होते. मात्र आता नायगाव बीडीडी चाळ ‘शरद पवार नगर’ या नावाने नाही तर ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ या नावाने ओळखली जाणार आहे. नायगाव चाळीचे नाव बदलण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या तिन्ही ठिकाणच्या पुनर्विकासाने वेग घेतला आहे. येत्या काही महिन्यांपासून पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान या बीडीडी चाळींच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकाळात घेतला होता. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयानुसार ना. म. जोशी मार्ग चाळीस ‘राजीव गांधीनगर’, नायगाव चाळीस ‘शरद पवार नगर’ आणि वरळी बीडीडी चाळीस ‘बाळासाहेब ठाकरे नगर’ असे नाव देण्यात आले होते. या तिन्ही चाळींच्या नामांतराला स्थानिकांकडून त्यावेळेस विरोध झाला होता. स्थानिकांनी ही नावे बदलण्याची लेखी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. असे असताना आता महायुती सरकारने स्थानिकांची मागणी मान्य करत नायगाव चाळीचे नाव बदलले आहे. नायगाव बीडीडी चाळीचे ‘शरद पवार नगर’ असे असलेले नाव बदलून आता ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामांतर करण्यात आले आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा – अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाची मुंबईत हत्या, तिघांना अटक

हेही वाचा – चार जिल्ह्यांत सुरू होणार फिरते पक्षाघात केंद्र

स्थानिकांनी, लोकप्रतिनिधींनी नायगाव चाळीचे ‘शरद पवार नगर’ असे असलेले नाव बदलण्याची मागणी केली होती. नायगाव बीडीडी चाळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली चाळ आहे. या चाळीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे ‘शरद पवार नगर’ असे नाव बदलून ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामांतर करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नायगाव चाळीचे नाव बदलल्यानंतर आता ना.म. जोशी मार्ग चाळीचे ‘राजीव गांधी नगर’ असे असलेले नाव बदलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करण्याबाबत लवकरच स्थानिकांची एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी करण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांऐवजी महापुरुषांची नावे देण्याची मागणी स्थानिकांची आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not sharad pawar nagar but dr babasaheb ambedkar bdd complex name changed to naigaon bdd chawl mumbai print new ssb