नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतदारांना ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला. परंतु तो निर्थक ठरला आहे, असे मत राज्यपाल के. शंकरनारायण यांनी शनिवारी व्यक्त केले.
प्रेस क्लब, मुंबईतर्फे नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रेडइंक २०१४’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘हिंदुस्थान’च्या माजी संपादक मृणाल पांडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याचबरोबर विविध गटांमध्ये सुमारे ३० पत्रकारांना ‘रेडइंक २०१४’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मतदान न करणारे मतदार एक प्रकारे ‘नोटा’चाच वापर करतात असे म्हणावे लागेल. तसेच मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्रावरील ‘नोटा’ची कळ दाबणे म्हणजे मतदान न केल्यासारखेच आहे. त्यामुळे ‘नोटा’चा पर्याय निवडणारे मतदार आपला वेळ वाया घालवतात, असे के. शंकरनारायण म्हणाले.
जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्रात काम करतो, तेव्हा पत्रकार मित्र असावे लागतात. सध्या वृत्तवाहिन्यांमध्ये कमालीची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले नाहीत. परस्परांमध्ये निर्माण झालेली जीवघेणी असूया चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यात विश्वास ठेवतो. पत्रकारांनी अचुकता, समतोल आणि पारदर्शकपणा आपल्या बातम्यांमध्ये पाळायला हवा. त्यांनी स्वत:ला आचारसंहिता लागू करायला हवी, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा