शहरातील सर्वच कनिष्ठ न्यायालयांच्या परिसरात वा पायऱ्यांवर खुर्ची-टेबल मांडून बसणारे वकील किंवा नोटरी या पुढे बेपत्ता होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या परिसरात तसेच पायऱ्यांवर बस्तान मांडणाऱ्या या वकील व नोटरींना मज्जाव करणारे परिपत्रक मुख्य महानगरदंडाधिकारी एस. एस. शिंदे यांनी यांनी नुकतेच काढले आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे अशा प्रकारे न्यायालयाच्या परिसर वा पायऱ्यांनाच कार्यालयाचे स्वरूप देणाऱ्या वकील आणि नोटरींची चांगलीच पंचाईत होणार आहे.
मुंबईतील मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयापासून बहुतांशी सर्वच न्यायालयांच्या आवारात वा पायऱ्यांवरच बरेचसे वकील व नोटरी खुच्र्या-टेबल मांडून आपले काम करीत असतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे विशेषत: पायऱ्यांमध्ये टेबल-खुर्ची मांडून उभ्या केलेल्या तात्पुरत्या कार्यालयांमुळे न्यायालयात येणाऱ्या अन्य वकील व पक्षकारांना मोठय़ा प्रमाणात त्याचा त्रास व गैरसोय सहन करावी लागते. हीच बाब परिपत्रकातही नमूद करण्यात आली असून न्यायालयाच्या परिसरात अशाप्रकारचे अडथळे नसायला हवेत आणि वकील-पक्षकारांना न्यायालयात येताना अशा प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू नये, असेही म्हटले आहे.
मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी मुंबईतील सर्व १४ कनिष्ठ न्यायालयांना अशाप्रकारे काम करणाऱ्या वकील व नोटरींना मज्जाव करण्यासंदर्भातील नोटीस पाठवली आहे. तसेच ती नोटरी  आणि बार असोसिएशनकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.    

Story img Loader