मालमत्ता व्यवहारांच्या नोंदणीत १५ दिवसांत ३० टक्क्यांची घट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निश्चलनीकरणाचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत असताना विविध उद्योग क्षेत्रांतही या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नोटाबंदीमुळे बाजारात निर्माण झालेला चलन तुटवडा आणि नोटाबदली करण्यात अडकलेली जनता यांमुळे मुंबईतील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीत तब्बल ३० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या १५ दिवसांत हे चित्र दिसत असताना चलनतुटवडा असाच कायम राहिल्यास गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

देशात उडालेल्या चलनकल्लोळाचे परिणाम दिवसेंदिवस दाहक होत चालले असून याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह उद्योगांना बसला आहे. काळा पैसा हटवणे हे या निश्चलनीकरणाचे मुख्य उद्दिष्ट असून बांधकाम क्षेत्रात काळा पैसा वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे वरकरणी या क्षेत्रातून निश्चलनीकरणाचे स्वागत होत असले तरी, रोख व्यवहारांवर आलेल्या नियंत्रणामुळे या क्षेत्रात तात्पुरती मंदी आल्याचे चित्र आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसांतील गोंधळामुळे मुंबईतील मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणीत ३० टक्क्य़ांनी घट झाली आहे. कारण, गेल्या काही दिवसांत असलेले पैसे बदलून घेण्यापासून खर्चासाठी पैसे काढण्याच्या प्रक्रियेत सामान्य नागरिक गर्क आहेत. त्यामुळे गृहखरेदी किंवा अन्य मालमत्तांची खरेदी करण्यासाठी कोणीही धजावलेले नाही. तसेच ज्यांचे पूर्वी ठरलेले व्यवहार होते तेही या निर्णयानंतर बारगळल्याने मालमत्ता नोंदणीवर फरक झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील बांधकाम क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून मंदी असतानाच ही परिस्थिती ओढावल्याने या क्षेत्राला खीळ बसण्याची शक्यताही काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच दर वर्षी जानेवारी महिन्यात मुद्रांक शुल्कांच्या दरात वाढ होते. त्यामुळे बहुतांश जण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच विकत घ्यायच्या मालमत्तांचे मुद्रांक शुल्क भरतात. मात्र, त्यावेळेसच निश्चलनीकरणाचा निर्णय आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे रमेश प्रभू म्हणाले की, खरेदी-विक्रीचा व्यवहार हा रोखीने बहुतेकदा चालतो. मात्र आजवर वापरात असलेली रोख चलनाबाहेर आल्याने व्यवहार थंडावले आहेत. बांधकाम क्षेत्राला सावरण्यास पुढील सहा महिन्यांचा काळ जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

आमच्याकडे होणाऱ्या मालमत्ता नोंदणीत राज्यात ३८ टक्के तर मुंबईत ३० टक्के घट झाली आहे. गेल्या पंधरा दिवसानंतर हे चित्र पुढे आले आहे. यात पुढे अजून किती घट होईल हे आत्ताच सांगणे अवघड आहे.

डॉ. रामस्वामी, महानिरीक्षक, मुद्रांक नोंदणी विभाग

गेल्या एक ते दीड वर्षांपासून मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राला  मंदीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच हा निर्णय झाल्याने या क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. मालमत्ता नोंदणीत सध्या झालेली ३० टक्क्य़ांची घट आगामी काळात ६० टक्क्य़ांपर्यंतही जाण्याची शक्यता आहे.

आनंद गुप्ता, ऑल इंडियन बिल्डर्स असोसिएशन

सध्या प्रत्येकालाच रोकडची आवश्यकता आहे आणि त्यात बांधकाम क्षेत्रात काळा पैसाच वापरला जातो. त्यामुळे हे क्षेत्र सर्वाधिक बाधित झाले आहे. बँकांनी पूर्वीसारखेच पैसे देणे सुरू केल्यावर कारभार सुरळीत होऊ शकेल.

संजय कुमार, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Note banned issue