मुंबई : नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाची गती वाढविण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने इमारती रिकाम्या करून घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. काही दिवसांपूर्वी दोन इमारतीतील पोलिसांना निष्कासनाच्या नोटिसा बजावल्यानंतर आता मंडळाने तेथील आणखी चार इमारतींना निष्कासनाच्या नोटीसा पाठविल्या आहेत. रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला आहे तर मंडळ मात्र कारवाईवर ठाम आहे.

नायगावमधील ४२ पैकी दोन इमारती पाडण्यात आल्या आहेत. सध्या मोकळ्या ठिकाणी बांधकाम सुरू असून व्यापक स्वरूपात काम करण्यासाठी मंडळाने इमारती रिकाम्या करून घेण्याच्या कामाला गती दिली आहे. त्यानुसार १७ आणि १८ क्रमांकाच्या इमारतींना निष्कासनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारतीत पोलीस कुटुंबे राहत असून त्यांच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या कारवाईला विरोध केला आहे. हा विरोध पाहता तूर्तास पुढील कारवाई थांबविण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे आणखी चार इमारतींना निष्कासनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इमारत क्रमांक १,१९,२० आणि २१ ला या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. रहिवाशांनी ४८ तासात घरे रिकामी करण्याच्या या नोटिसा आहेत. या इमारतीतील रहिवाशांनीही या कारवाईला विरोध केला आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच घरे रिकामी करू अशी त्यांची भूमिका आहे. करारपत्र देण्याची पोलीस कुटुंबांची मागणी आहे.  मात्र पोलिसांच्या घरांबाबत अद्याप निश्चित निर्णय झाला नसल्याने त्यांना करारपत्र देता येत नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सध्या रहिवाशांशी चर्चा करून घरे रिकामी करण्याचा प्रयत्न मंडळाकडून सुरू आहे.  मात्र त्याचवेळी गरज पडल्यास निष्कासनाची कारवाई करण्याची मंडळाची तयारी असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader