मुंबई : दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे मुंबईतील घर असलेल्या इमारतीवर पालिकेने नोटीस बजावली आहे. खार येथील १४ वा रस्ता येथील इमारतीत राणा दाम्पत्याचे घर असून पालिकेने या इमारतीवर नोटीस बजावली आहे. या संपूर्ण इमारतीची बुधवारी पाहणी होणार आहे. तशी नोटीस पालिकेने इमारतीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवली आहे.
राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण दिवसभर मुंबईतील वातावरण तापलेले होते. खार पश्चिम येथील १४ वा रस्ता येथील ‘लाव्ही’ इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने ही नोटीस पाठवली आहे.