मुंबई : ‘अल्ट बालाजी’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी एकता कपूर, शोभा कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याची सूचना करण्यात आले आहे. वेबसिरीजमधील अश्लील दृश्यामध्ये अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमएचबी पोलिसांनी शुक्रवारी ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’, एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकारणी आरोपींना नोटीस पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात येणार आहे. याप्रकरणी प्रथम तक्रारदाराचा सविस्तर जबाब नोंदावण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ

याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्ट बालाजी’वरील ‘क्लास ऑफ २०१७’ आणि ‘क्लास ऑफ २०२०’ या वेब सिरिजबाबत तक्रार करण्यात आली आहे. यावेळी अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मुलीला अश्लील अर्थाचे संवाद देण्यात आल्याने, कलाकार शालेय गणवेशात अश्लील कृत्य करताना दाखवण्यात आल्याने मुलांवर परिणाम होऊ शकतो. याप्रकरणी तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम १३ व १५ , माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा ६७ (अ), वुमन प्रोहिबिशन ॲक्ट १९८६ कलम २९२, २९३ व भादंवि कलम २९५ (अ) तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंधक कायद्या २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला होता. यावेळी तिला अश्लील संवादही देण्यात आले होते. तसेच प्रतिबंध असतानाही सिगारेटचा वापर करण्यात आला होता. त्याबाबत कोणताही वैधानिक इशारा(डिस्क्लेमर) देण्यात आलेले नाही. तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींचा अपमान होईल, असे व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच बोरिवली न्यायालयातही तक्रार अर्ज दाखल केला होेता. न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to ekta kapoor shobha kapoor in case of web series on alt balaji mumbai print news amy