ओवळा-माजीवडा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन वर्षांपुर्वी उपवन येथे आयोजित केलेल्या दिवाळी मेळाव्यात वीज चोरी झाल्याच्या आरोपावरुन निर्माण झालेल्या वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून याप्रकरणातील तक्रारदार तसेच कामगार नेते विक्रांत कर्णिक यांनी सरनाईक यांना पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशा आशयाची नोटीस बजाविल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्णिक यांच्यावर खंडणीखोरी तसेच जातीवाचक बदनामी केल्याचे गुन्हे दाखल झाले होते. या खोटय़ा गुन्ह्य़ांमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत कर्णिक यांनी थेट सरनाईक यांना नोटीस पाठवली आहे.
आमदार सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने २०१० मध्ये उपवन येथे आयोजित करण्यात आलेल्या वीज चोरी होत असल्याची तक्रार कर्णिक यांनी केली होती. या तक्रारीमुळे सरनाईक अडचणीत सापडले होत. तसेच यामुळे ठाण्यातील राजकीयच वर्तुळात मोठे वादंग निर्माण झाले होते. या आरोपांमुळे एकीकडे सरनाईक यांच्याभोवती संशयाचे वर्तुळ गडद होत असताना कर्णिक यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सरनाईक यांचे निकटचे सहकारी चंद्रकांत एगडे यांनी केली होती. तसेच वीज चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी कर्णिक यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली अशी तक्रारही सरनाईक यांचे तेव्हाचे कट्टर समर्थक सुधीर बर्गे आणि एगडे यांनी केली होती. या दोन्ही तक्रारी पुढे बोगस ठरल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, याच काळात कर्णिक यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने येथील राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. कर्णिक यांच्याविरोधातील तक्रारींची तातडीने दखल घेणाऱ्या पोलिसांना त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध लावता आला नव्हता. त्यामुळे ठाणे पोलिसांची भूमीकाही याप्रकरणी वादात सापडली होती. दरम्यान, गेली दीड वर्षे हे प्रकरण शांत होते. मात्र, आपल्याविरोधातील तक्रारी बोगस असल्याचा आरोप करत कर्णिक यांनी सरनाईक, एगडे आणि बर्गे अश तिघांना पाच कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडल्याने सरनाईक यांना पुन्हा आव्हान दिल्याचे बोलले जाते. वीज चोरीचे प्रकरणाने पुन्हा उचल खाल्याने पाणी चोरीच्या आरोपावरुन ठाणे महापालिकेतील प्रशासनाशी दोन हात करणाऱ्या सरनाईक यांना नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.   

Story img Loader