बोरिवलीमध्ये शुक्रवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीच्या संकुलातील अन्य जीर्ण झालेल्या तीन इमारतींचे तीन दिवसांमध्ये पाडकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. ही मुदत आज संपुष्टात आली. सोसायटीने या धोकादायक इमारतींचे पाडकाम न केल्यास मुंबई महानगरपालिकेमार्फत त्या जमीनदोस्त करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – २५ वर्षांची मुंबईची सत्ता टिकविण्याचे शिवसेनेपुढे कडवे आव्हान
बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली ही चार मजली इमारत शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जमीनदोस्त झाली. ही इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे इमारतीतील बहुतांशी रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. या इमारतीत तीन – चार कुटुंबेच वास्तव्यास होती. सकाळी १० च्या सुमारास रहिवाशांना इमारतीला हादरे बसत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब इमारत रिकामी केली व १२.३० च्या सुमारास इमारत कोसळली.
हेही वाचा – “५० खोके, माजलेत बोके, एकदम ओके”, पवार-दानवेंच्या नेतृत्वात विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
गीतांजली संकुलातील चार इमारती असून या सर्वच इमारती धोकादायक बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने २०१९ मध्ये नोटीस बजावली होती. मात्र गृहनिर्माण सोसायटीने मुंबई महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे (टॅक कमिटी) धाव घेतली होती. समितीनेही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही रहिवासी इमारत रिकामी करीत नव्हते. त्यानंतर सोसायटीने न्यायालयात धाव घेतली व कारवाईवर स्थगिती मिळवली होती. त्यामुळे ही इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली नव्हती. जी इमारत पडली त्यात काही कुटुंबे वास्तव्यास होती.
या दुर्घटनेनंतर अन्य तीन इमारती तात्काळ रिकाम्या करण्याची सूचना रहिवाशांना करण्यात आली होती. तीन इमारतींचेही वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्यानंतर तात्काळ त्या पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सोसायटीला नोटीस पाठवून इमारतींच्या पाडकामासाठी सोमवारी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली होती.