महालक्ष्मी येथील रेसकोर्सची भाडेपट्टय़ाची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीचा ३० टक्के भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने परत करावा अन्यथा नोटीस बजावून रेसकोर्सची जागा रिकामी करावी लागेल, असा इशारा महापौर सुनील प्रभू यांनी गुरुवारी दिला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या भाडेपट्टय़ाची मुदत ३१ मे रोजी संपुष्टात येत आहे. रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि थीम पार्क उभारण्यात यावे, असे पत्र सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना यापूर्वीच दिले होते.
मात्र त्यावरील वादंगानंतर रेसकोर्सवरील केवळ ३० टक्के जागा महापालिकेची आणि उर्वरित जागा राज्य सरकारची असल्याचे उजेडात आले. पालिकेने आपल्या मालकीची ही ३० टक्के जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने हा भूखंड पालिकेच्या ताब्यात द्यावा. अन्यथा नोटीस बजावून हा भूखंड ताब्यात घ्यावा लागेल, असे सांगून सुनील प्रभू म्हणाले की, सध्या रेसकोर्सचा वापर केवळ श्रीमंतांसाठी होत आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या मालकीचा २.५५ लाख चौरस मीटर भूखंड ताब्यात घ्यावा आणि त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारावे. पर्यावरण आणि मुंबईकरांच्या दृष्टीने ते हितकारक ठरेल. राज्य सरकारने रेसकोर्सच्या भूखंडाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सुनील प्रभू यांनी केले.